Ad will apear here
Next
तटरक्षक दलाच्या पुढाकाराने भाट्ये किनाऱ्याची स्वच्छता
१२०० विद्यार्थ्यांचा सहभाग


रत्नागिरी :
भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरीतील विभागाने दर वर्षीप्रमाणे यंदाही पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छतादिनी रत्नागिरीमधील भाट्ये किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले.

या उपक्रमाला रत्नागिरीतील नवनिर्माण हायस्कूल, माने इंटरनॅशनल स्कूल, शिर्के हायस्कूल, सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, देसाई हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, गोदूताई जांभेकर हायस्कूल, फाटक हायस्कूल, जी. जी. पी. एस., फिनोलेक्स इंजिनीअरिंग कॉलेज, गोगटे-जोगळेकर कॉलेज, यश नर्सिंग कॉलेज, ईकरा पब्लिक स्कूल, मुंबई युनिव्हर्सिटी उपकेंद्र, पोदार इंटरनॅशनल स्कूल, मिस्त्री हायस्कूल व एनसीसी युनिट यांचे सुमारे १२०० विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून नगराध्यक्ष राहुल पंडित यांची सलग दुसऱ्या वर्षीही उपस्थिती लाभली. त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून ‘प्रत्येक नागरिकाने सागरी किनाऱ्याची स्वच्छता अबाधित राखली पाहिजे,’ असे आवाहन केले. 

‘तटरक्षक दलाचे जवान देशाच्या समुद्रसीमेचे रक्षण करण्यासाठी असून, ते आपल्या शहराची स्वच्छता घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत, ही आपणासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही तटरक्षक दलाची नव्हे, तर नागरिक म्हणून आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. प्लास्टिक व इतर कचरा यामुळे पर्यावरण दूषित होतेच; पण त्याबरोबर सागरी प्राण्यांच्या जिवास धोका निर्माण होतो,’ असे ते म्हणाले.

या वेळी त्यांनी रत्नागिरीच्या नागरिकांचे त्यांच्या स्वच्छताप्रियतेबद्दल व जाणीवपूर्वक सहभागातून स्वच्छ शहर स्पर्धेत देशातील चार हजार शहरांमध्ये ४०वा क्रमांक आल्याबद्दल कौतुकही केले. ‘तटरक्षक दलाचा हा उपक्रम स्तुत्य असून, यातून तरुण पिढीने धडा घेतला पाहिजे. आपला समुद्रकिनारा, परिसर, घर आपण स्वच्छ ठेवले पाहिजे. हा संदेश आपल्या भावी पिढीला दिला पाहिजे,’ असे प्रतिपादन पंडित यांनी केले.

तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर एस. आर. पाटील म्हणाले, ‘तटरक्षक दल स्थानिक संस्थांच्या मदतीने संपूर्ण देशभरात दर वर्षी सप्टेंबर महिन्यात सागरी व किनारी पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दलच्या जनजागृतीसाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या योजनेप्रमाणे आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता अभियानाचे आयोजन करतो. चेन्नई, विशाखापट्टणम, अंदमान, कोलकाता, पोरबंदर, मंगळूर आदी ठिकाणीदेखील हे अभियान यापूर्वी राबविण्यात आले आहे; पण रत्नागिरीतील विद्यार्थी व जनतेमध्ये जी जागरूकता आहे व त्यांचा जो उदंड प्रतिसाद दिसतो, तो अन्यत्र पाहावयास मिळत नाही.’

एस. आर. पाटील म्हणाले, ‘स्वच्छता हा नगराध्यक्षांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे रत्नागिरी शहराला स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळाले आहे. रत्नागिरी, तसेच संपूर्ण कोकण निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले आहे. त्यामुळे येथे स्वच्छता अभियान किंवा इतर लोकाभिमुख कार्यक्रम राबविताना थोडाफार हातभार लावण्याने आम्हा सैनिकांनादेखील खूप आनंद मिळतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये परिसर स्वच्छतेबाबत हळूहळू जागृती निर्माण होत असून, त्यामध्ये शिक्षक व पालकांचे योगदान अनन्यसाधारण आहे. सागरी किनाऱ्यांचे जाणीवपूर्वक संरक्षण आणि संवर्धन करणे हे जरूरीचे बनले आहे. स्वच्छतेचा हा संदेश प्रत्येक मुलापर्यंत, व्यक्तीपर्यंत, घरापर्यंत या मोहिमेद्वारे पोहोचेल, अशी आशा आहे.’

या कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीज, गद्रे मरीन प्रॉडक्ट्स, आंग्रे पोर्ट, लावगण पोर्ट, जेएसडब्ल्यू पोर्ट, पराग इंटरप्रायजेस, ओम्नी मरीन्स मुंबई, सिद्धनाथ पेट्रोल पम्प यांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

तटरक्षक दलातर्फे कमांडंट अतुल दांडेकर, कमांडंट आचार्युलू, उपकमांडंट एस. चौहान, उपकमांडंट अभिषेक करुणाकर, उपकमांडंट अण्णू यादव, सहायक कमांडंट आशित सिंग आदी अधिकारी व सुमारे १५० जवानांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमादरम्यान मेडिकल फर्स्ट एड सुविधा पुरविण्यात आली. तसेच खबरदारी म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी किनाऱ्यावर तटरक्षक दलाचे निष्णात पाणबुडे (डायव्हर) सज्ज ठेवण्यात आले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZUUBS
Similar Posts
भाट्ये किनाऱ्यावर तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट दाखल रत्नागिरी : तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस एच १९८’ हे हॉवरक्राफ्ट देशाच्या पश्चिम किनार्‍यावर गस्त घालत असताना १० जानेवारी २०१९ रोजी रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर दाखल झाले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ११ जानेवारीला सकाळी या हॉवरक्राफ्टच्या कार्यप्रणालीची पाहणी करून सागरी सुरक्षेचा आढावा घेतला
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनी तटरक्षक दलातर्फे भाट्ये किनाऱ्याची स्वच्छता रत्नागिरी : दर वर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरीतील केंद्राने पुढाकार घेऊन २१ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सागरकिनारा स्वच्छता दिन साजरा केला. रत्नागिरीमधील भाट्ये किनाऱ्यावर सकाळी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात रत्नागिरीतील ईकरा पब्लिक स्कूल, फिनोलेक्सचे
डॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरी विमानतळावर प्रथम यशस्वी लँडिंग करीत तटरक्षक पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय चाफेकर, पीटीएम, टीएम यांचे नऊ ऑगस्ट रोजी डॉर्नियर विमानाने आगमन झाले. तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा प्रथमच रत्नागिरी दौरा आहे
तटरक्षक कमांडंट पाटील यांची दिल्लीत बदली रत्नागिरी : येथील तटरक्षक दलाचे स्टेशन कमांडर कमांडंट एस. आर. पाटील यांची दिल्ली मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांनी २०१७मध्ये कमांडंट एस. एम. सिंग यांच्याकडून येथील तटरक्षक दलाच्या स्टेशन कमांडर पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language